दत्ता गाडे यांच्या वकिलांच्या सहाय्यकाचे अपहरण   

बोपदेव घाटात मारहाण करुन दिवे घाटात सोडले

पुणे : स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेच्या वकिलाकडे नोकरी करणार्‍या एका सहाय्यक वकिलाचे सोमवारी अनोळखी व्यक्तींनी अपहरण केले. बोपदेव घाटात नेऊन त्यांना बेदम मारहाण केली. यात वकिल गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी अपहरणकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. अपहरण व मारहाणीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.  
 
साहिल डोंगरे, असे मारहाण झालेल्या सहाय्यक वकिलाचे नाव आहे. दत्तात्रय गाडे याचे वकील वाजिद खान बिडकर यांच्याकडे डोंगरे हे सहाय्यक वकील म्हणून काम करतात. डोंगरे यांचे सायंकाळी हडपसर परिसरातून काही व्यक्तींनी मोटारीतून अपहरण केले. नंतर त्यांना बोपदेव घाटात नेण्यात आले. तिथे डोंगरे यांना बेदम मारहाण करून अपहरणकर्त्यांनी त्यांना दिवे घाटात सोडून दिले. मारहाण झाल्यानंतर डोंगरे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सध्या वकील डोंगरे यांच्यावर ससून रूग्णालयात उपचार सुरू आहे. 
 
दरम्यान, डोंगरे यांचे अपहरण कोणी केले? त्यांना मारहाण कोणी आणि का केली? स्वारगेट अत्याचार प्रकरणाशी याचा काही संबंध आहे का? या अनुषंगाने हडपसर पोलिसांकडून तपास केला जात आहे. वकील वाजिद खान बिडकर यांनी या प्रकरणाचा निषेध केला आहे. 

वकील बिडकरकडून चित्रफित प्रसारित 

गाडेचा वकिल वाजिद खान बिडकर यांनी साहिल डोंगरे यांच्या अपहरणाची चित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित केली आहे. या चित्रफितमध्ये डोंगरे यांनी स्वत:चे अपहरण आणि मारहाणीचा प्रसंग सांगितला आहे. एका गुन्ह्याच्या केसमध्ये मी हडपसर पोलीस ठाण्यात गेलो होतो. तिथे मला एक ग्राहक भेटायला आला. त्यांनी मला ५४ हजार रूपये दिले. त्यानंतर काम आटोपून घरी निघालो असता माझ्या दुचाकीतील पेट्रोल संपले. त्यामुळे मी जवळच्या पेट्रोलपंपावर गेलो. त्यानंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या एका व्यक्तींनी मदत मागितली. मदतीच्या बहाण्याने मोटारीतील काही व्यक्तींनी माझे अपहरण केले. बोपदेव गाटात नेऊन मारहाण केली. नंतर मला दिवे घाटात सोडून ते पळून गेले. त्यानंतर मी जखमी अवस्थेतच स्वत:ला सावरत पोलीस ठाण्यात आलो. 
 

Related Articles